अमरावती : रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरने कोरोना चाचणी करण्यास सांगितले. शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबमधून एका अटेंडंटला चाचणी करण्यास बोलवण्यात आले. मात्र, अटेंडंटने चाचणी करण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. महिलेच्या पतीने अतिरिक्त पैसे देण्यास नकार देताच, तो अटेंडंट या महिलेची चाचणी न करताच परत निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला.
अमरावती येथील डॉ. मोनाली ढोले यांच्या रुग्णालयात शुक्रवारी थायरॉइडच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिलेला तिच्या कुटुंबीयांनी आणले होते. डॉक्टरांनी आधी त्या महिलेची कोरोना चाचणी करण्याची विनांती नातेवाइकांना केली. त्यानुसार नातेवाइकांनी कल्याणनगर येथील अश्विन पॅथॉलॉजी लॅबमधील एका अटेंडंटला संबंधित महिलेची कोरोना चाचणी करण्यासाठी बोलावले.
अश्विनी पॅथॉलॉजीमधला अटेंडंट रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यास डॉ. ढोले यांच्या रुग्णालयात आला. मात्र, त्याने गर्भवती महिलेची चाचणी करण्यापूर्वी 900 रुपयांची मागणी केली. यावर त्या महिलेचा पती निखिल सामटकरने अटेंडंटकडे पावती मागितली. मात्र, पावती मिळत नसल्याचे अटेंडंटने सांगितले. मी ऑनलाइन पैसे देतो, असे निखिल सामटकर यांनी सांगताच ऑनलाइन 600 रुपये द्या आणि उर्वरित 300 मला रोख हवेत, असे तो अटेंडंट म्हणाला. ही पावती मला कार्यालयात सादर करायची असल्यामुळे मागतो आहे. पावती नाही तर, ऑनलाइन पैसे दिल्याचे स्टेटमेंट ऑफिसला सादर करता येईल, असे म्हणताच तो अटेंडंट वेदनेने व्हिवळत असणाऱ्या महिलेची चाचणी न करताच निघून गेला.
या प्रकारामुळे संतप्त निखील सामटकर आणि त्यांचे वडील वासुदेव सामटकर यांनी अश्विनी पॅथॉलॉजी येथे पोचून डॉ. सतीश भागवत यांच्याकडे घडलेल्या प्रकारची तक्रार केली. डॉ. भागवत यांनीही चाचणीसाठी घेतलेल्या जाणाऱ्या रकमेची पावती दिली जात नाही, असे स्पष्ट केले. डॉ. भागवत यांचे हे म्हणणे ऐकून सामटकर पिता-पुत्रांनी डॉ. भागवत यांच्याशी वाद घातला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून डॉ. भागवत यांनी 700 रुपयांची पावती देऊन त्यांच्याकडच्या व्यक्तीला पुन्हा डॉ. ढोले यांच्या रुग्णालयात पाठविले आणि त्या महिलेची अँटीजेन रॅपिड चाचणी करून दिली. सुदैवाने त्या महिलेची चाचणी निगेटिव्ह आली.
हेही वाचा - शिक्षण प्रशिक्षण संस्था 'डायट'वर; पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ