अमरावती - घनदाट जंगलांनी वेढलेल्या मेळघाटात इंग्रजकालीन काही महत्त्वाची विश्रामगृहे आहेत. यापैकी एक असणारे कोलकास येथील विश्रामगृह उंच डोंगरावर वसले असून या विश्रामगृहाच्या खालून सिपना नदी वाहते. अवतीभवती कुठलेही गाव नाही. केवळ प्रचंड शांत पाणी आणि निसर्गाच्या सौंदर्याची उधळण करणाऱ्या या विश्रामस्थळाचे महत्त्व काही आगळेवेगळे आहे.
अमरावती ते धारणी मार्गावर सेमाडोहपासून काही अंतरावर डाव्या दिशेने 2 किमी अंतरावर कोलकास वसले आहे. या परिसरात कुठलीही नागरी वसाहत नाही. हा परिसर पूर्वी या भागातील व्यापारी माल ठेवण्याचे ठिकाण होते. आता कोलकास हे मेळघाटातील हत्ती सफारीसाठी ओळखले जाते.
कोलकासचे वैशिष्ट्य म्हणजे येथील विश्रामगृह आहे. सिपना नदीच्या काठावर इंग्रजांनी खास अशा विश्राम गृहासाठी ही जागा निवडली होती. इंग्रजांनी याठिकाणी विश्रामगृह उभारल्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1970 साली या विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात आले. विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन तत्कालीन हिमाचल प्रदेशचे वनमंत्री पददेव यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे वनउपमंत्री भाऊसाहेब पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे 1970 मध्ये विश्राम गृहाचे नुतनीकरण होताच 1974 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या मेळघाटात आल्या असता त्यांनी कोलकास येथील विश्रामगृहाला भेट दिली होती.
कोलकास येथील विश्रामगृहासमोर सखोल अशा दरीतून सिपना नदी वाहते. पावसाळ्यात विशेषतः श्रावण महिन्यात कोलकासचा हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला असतो. कोलकास परिसरात वाघ, अस्वल, चितळ, बिबट, सांबर असे वन्य प्राणी आढळतात. पर्यटकांना कोलकासमध्ये आल्यावर शक्यतो अस्वलाचे दर्शन तरी घडतेच. वन्य प्राण्यांसोबतच मोर, जंगली कोंबडा, पोपट असे विविध पक्षीही या भागात आढळतात.
कोलकासच्या विश्रामगृहात एकूण चार दालने आहेत. या दालनांना सिपना, खापरा, खुर्सी, खुंड असे मेळघाटातून वाहणाऱ्या नद्यांची नावे दिली आहेत. या चार दालनांसोबतच भोजनालयाची वेगळी आणि विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विश्रामगृहाच्या भिंतीवर नीलगाय, सांबर यांचे भुसा भरून लावण्यात आलेले मुंडके येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधते.
कोलकासला येण्यासाठी पर्यटन विभागाच्या मॅजिक मेळघाट या संकेतस्थळावर बुकिंग करावी लागते. कोलकास येथील विश्रामगृहातील चार दालनांसोबतच विश्रामगृहाच्या खाली काही अंतरावर पर्यटकांना वनकुटी तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रामगृहात राहता येते. कोलकासच्या विश्रामगृहात दिवस उजाडताच थेट सूर्याचा प्रकाश सातपुडा पर्वतातून आतमध्ये येतो. सकाळची वेळ असो किंवा सायंकाळची कोलकास येथील विश्रामगृहाच्या उंच भागावरून खाली वाहणाऱ्या सिपना नदीभोवतालचे जे काही नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते ते येथे येणारा पर्यटक आयुष्यभर डोळ्यात साठवून ठेवू शकतो इतकं मौल्यवान असे निसर्ग सौंदर्य लाभले आहे.