अमरावती- बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रवी राणा यांना पाठिंबा नाही. खरंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा रवी राणा यांच्याशी कुठलाही संबंध नसून आघाडीत असणाऱ्या जोगेंद्र कवाडे यांनी रवी राणा यांना तिकीट विक्री केली, असा आरोप जिल्हा सरपंच संघटनेने केला आहे.
जिल्ह्यातील सरपंचांच्या विविध समस्या विधानसभेत सोडविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमचा आवाज उठवतील, असा विश्वास असल्याने आमचा पाठिंबा जिल्ह्यातील आठ पैकी बडनेरा मतदारसंघ वगळता सातही मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांना असल्याचे आज जिल्हा सरपंच संघटनेने सांगितले. संघटनेच्या वतीने पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सदर माहिती देण्यात आली.
बडनेरा विधानसभा मतदारसंघात मात्र आमचा पाठिंबा रवी राणा यांना अजिबात असणार नाही. ते स्वतःला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे समर्थ उमेदवार म्हणून सांगत जरी असले तरी बडनेराची जागा ही जोगेंद्र कवाडे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साठी सुटली होती. ही जागा कवाडे यांनी रवी राणा यांना विकली असून आम्ही अशा कृत्याचा निषेध करतो. आणि आमच्या संघटनेचा पाठिंबा बडनेरा मतदारसंघ वगळता अमरावती जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना जाहीर करतो, असे संघटनेचे सचिव अहमद खान पठाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेघश्याम घोगडे, विलास तायडे, मोहम्मद गुलाम नबी आदी उपस्थित होते.
हेही वाचा- हवा घेण्यासाठी सुरक्षा रक्षकाला केले बाजूला; उकाड्याने अमित शाह हैराण