अमरावती - जागतिक अपंग दिन (International Day of Persons with Disabilities) दरवर्षी डिसेंबर 3 रोजी जगभरात साजरा केला जातो. सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. जन्मतःच अपंगत्व येणे आणि पहिल्या श्वासासोबतच जगण्यासाठी लढा देणाऱ्या अपंग बांधवांचा संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. असे असले तरी न डगमगता आपल्या जगण्याची आणि जीवनाची दिशा ठरवतांना अपंग बांधवांसाठी शासकीय योजनांची मदत तर होतेच. मात्र, खरी साथ त्यांना त्यांच्या आत्मबळाचीच आहे. अमरावती जिल्ह्यात संपूर्ण विभागात शासकीय योजनांचा लाभ घेत नैसर्गिकरित्या आलेल्या अडचणींवर मात करीत अनेक अपंग बांधव धडधाकट असणाऱ्या समाजासमोर आपला आदर्श प्रस्थापित करताना दिसत आहेत.
अपंग बांधव आज आत्मनिर्भर जीवन जगत आहेत. प्रहार आणि अपंग जीवन विकास संस्थेचा आधार -जिल्ह्यातील दृष्टीहीन, कर्णबधिर ,अस्थिव्यंग, विकलांग, दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगता यावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांची माहिती त्या गरजू व्यक्तींना कळावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना तसेच अमरावती शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी किशोर बोरकर यांच्या जीवन विकास संस्थेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. वीस वर्षांपासून बच्चू कडू यांची प्रहार संघटना अपंगांच्या मदतीसाठी सरसावली असून किशोर बोरकर यांच्या जीवन विकास संस्थेच्यावतीने अपंग व्यक्तींना व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षित करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली जात आहे. विशेष म्हणजे आपल्या अपंगत्वाबाबत रडत न बसता शहर आणि जिल्ह्यातील अनेक अपंग बांधव आज आत्मनिर्भर जीवन जगत असून आपल्या इतर अपंग बांधवांना जगण्यासाठी धीर देत आहेत.
प्रवीण भिवरीकर बनला आहे वृद्ध आई-वडिलांचा आधार -
जन्मतः अपंग असल्यामुळे चालू न शकणारा प्रवीण भिवरीकर हा युवक यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथून अमरावतीला आला. येथील अपंग जीवन विकास संस्थेच्या माध्यमातून त्याने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर या संस्थेतच संगणकाचे प्रशिक्षण घेतले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाड्याचे दुकान घेऊन कम्प्युटर ऑपरेटर म्हणून रोजगार मिळतो आहे. आता तिचे वृद्ध आई-वडील सुद्धा त्याच्यासोबत राहत असून मोठ्या बहिणीची जबाबदारी सुद्धा प्रवीण भिवरीकर कुठलीही कुरबूर न करता समर्थपणे पार पाडीत आहेत. पाच हजार रुपये भाडे असणाऱ्या घरात प्रवीणचे कुटुंब सध्या राहत असून लवकरच पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मिळालेल्या नव्या घरात जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
चालता ना येणारी अनामिका करत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी -
जन्मताच चालता येत नसणारी अनामिका जुमळे हिने इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. जन्मतः अनामिकाला चालता येत नाही. यामुळे आजही तिची आई तिला उचलूनच कामानिमित्त घराबाहेर नेते. परीक्षा देण्यासाठी सुद्धा तिने आईच्या कडेवरच परीक्षा केंद्र गाठले होते. सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करते आहे. बच्चू कडू यांच्यामुळे मला शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून दर महिन्याला मला पैसे मिळतात. स्पर्धा परीक्षेत मी किती टिकेल हे माहिती नसले, तरी तयारी मात्र जोमाने करते आहे, अशी अनामिका 'ई टीव्ही भारत'शी बोलताना म्हणाली. जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात तीन चाकी गाडी मिळावी यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सध्या तहसील कार्यालयात आई सोबत धावपळ करावी लागत असल्याचेही अनामिकाने सांगितले.
2016 चा कायदा अमलात यावा हीच मागणी -प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने 2016 मध्ये आम्हा अपंग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी समान संधी आणि समान हक्क मिळावा यासाठी जो कायदा संमत झाला. मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शासनाच्या प्रत्येक विभागाने या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली. अपंगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत केवळ एक हजार रुपये अनुदान दर महिन्याला दिले जाते. हे अनुदान पाच हजार रुपये पर्यंत वाढविण्याची तरतूद 2016 च्या कायद्यात करण्यात आली आहे मात्र आजही अपंगांना एक हजार रुपये मिळत आहेत.
वृद्धाश्रमाप्रमाणे अपंगांसाठी व्हावी व्यवस्था -
शहरी भागात अपंगांना अनेक योजनांची माहिती मिळते. मात्र ग्रामीण भागातील अपंग अशा योजनांपासून वंचित आहेत. त्यांना कुठलीही माहिती नसल्यामुळे आयुष्याच्या एका टप्प्यावर ते खचून जातात. आत्महत्या करावी का असे विचार माझ्या काही अपंग बांधवांच्या मनात आला. वृद्धापकाळाकडे वळताना आता आपले पुढे काय असा विचार अनेकांच्या मनात घोळत असतो. यामुळे वृद्धाश्रमात सारखी व्यवस्था अपंगांसाठी ही व्हावी, असे कृषी विभागात कर्मचारी असणारे रवी वानखडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
अमरावती विभागात अपंगांसाठी 105 शाळा -
अमरावती विभागात अपंग विद्यार्थ्यांसाठी एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमधून 4747 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी अमरावती जिल्ह्यात एकूण 26 शाळा असून यामध्ये एकूण 1140 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अकोला जिल्ह्यात 11 शाळांमधून 380 विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यात 34 शाळांमधून 1223 विद्यार्थी आणि वाशीम जिल्ह्यात 13 शाळांमध्ये 669 विद्यार्थी आहेत.
अशा आहेत अपंगांसाठी योजना -
अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळांमधून शिक्षण, शालांत परीक्षा पूर्व शिक्षणासाठी, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. कर्मशाळांमधून अपंग युवकांना व्यवसाय प्रशिक्षण. अपंग व्यक्तींना सरळ सेवेमध्ये भरतीसाठी तीन टक्के आरक्षण, उच्च वयोमर्यादेत शिथिलता, स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, प्रशिक्षित अपंगांना व्यवसायिक यासाठी अर्थसहाय्य, असा विविध लाभ शासनाच्या अनेक योजना द्वारे अपंगांना मिळतो.
महापालिकेकडून अशी मिळते मदत -अमरावती शहरात राहणाऱ्या अपंगांना महापालिकेच्या वतीने विविध स्वरूपात मदत केली जाते. 18 ते 55 वर्ष वयाच्या अपंगांना एक वेळा दहा हजार रुपयांची मदत तसेच 55 वर्षाच्या वरील अपंगांना दरवर्षी 9 हजार रुपये दिले जातात. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. शहरात रोजगारासाठी अपंग व्यक्तींना छोटेसे दुकान थाटायचा ठी महापालिकेच्यावतीने वीस हजार रुपये दिले जातात. महापालिकेच्या या योजनेचा आतापर्यंत 3760 जणांनी लाभ घेतला असल्याची माहिती अमरावती महापालिकेच्या समाज विकास विभागातील धीरज घोरपडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
अपंगत्व निर्मूलनाचे प्रयत्न -
अपंग बांधवांना जगण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध असून तसे प्रयत्न आमच्या वतीने केले जातात. मात्र अपंगत्वाचे निर्मूलन व्हावे हा आमचा प्रयत्न असल्याचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे ईटीवी भारतशी बोलताना म्हणाले. आरोग्य विभागाच्या माध्यमातून गर्भवती महिलांना आणि लहान बालकांना विटामिन ए चे डोज देणे, सेक्स माता व बाल संगोपन ना साठी विविध प्रकारचे आहार पुरवणे रुबेला लस देणे त्याला प्राधान्य दिले जात असून याद्वारे बालकांमध्ये अपंगत्व येऊ नये, असे प्रयत्न केले जात असल्याचेही सुनील वारे म्हणाले.