अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान संगीता शिंदे यांच्या दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीतून बाद झालेले अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे संगीता शिंदे यांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते पुन्हा मोजण्यात यावी, अशी मागणी शेखर भोयर यांनी निवडणूक अधिकारी पीयूष सिंह यांच्याकडे केली आहे.
असा आहे आक्षेप -
27 फेऱ्यांपासून वाशीम येथील अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे पहिल्या क्रमांकावर, श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आणि शेखर भोयर तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान संगीता शिंदे बाद झाल्यावर त्यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या उमेदवारांच्या मत मोजणीनंत शेखर भोयर बाद झालेत. संगीता शिंदे यांच्या दुसऱ्यापसंतीच्या मतांमध्ये मला श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा 70 मतं अधिक असल्याचे आमच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. संगीता शिंदे यांच्या दुसऱ्या पसंती क्रमांकाची मतं पुनः मोजण्यात यावी, असे शेखर भोयर यांचे म्हणणे आहे.
शेखर भोयर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार-
शेखर भोयर यांच्या म्हणण्यानुसार भोयर यांना २५व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा ९ मतं जास्त होती. त्यानंतर सुरू झालेल्या पुढील फेरीच्या मतमोजणीआधी भोयर यांना देशपांडे पेक्षा १७१ मतांनी पिछाडीवर दाखवण्यात आले. याबाबत शेखर भोयर यांनी आक्षेप घेतला. तसेच फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याला नकार दिला असून शेखर भोयर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा- 'पदवीधरच्या निकालातून वाचाळवीरांना जबरदस्त चपराक'
हेही वाचा- शेतकरी आंदोलन : देशभरात पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे दहन करणार