अमरावती - उन्हाची दाहकता वाढत आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात आग लागण्याची प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसात शहरासह ग्रामीण भागातील सात ते आठ ठिकाणी आग लागल्याचे आढळून आले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दर्यापूर शहरात गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसाआधी दर्यापूर येथील बालाजी जिनिंगला आग लागून लाखो रुपयांचा कापूस व मशनरी जळून खाक झाल्या. थोड्याच दिवसानंतर पणपलिया यांच्या राहत्या घरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रांची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पुन्हा बुधवारी दर्यापूर शहरातील उर्दू शाळा लगत राहणाऱ्या गोकर्ण गोविंदराव वाघ यांच्या घराला दुपारच्या वेळेस आग लागली. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू महत्त्वाची कागदपत्रे बारा हजार रुपये जळून खाक झाले.तातडीने अग्निशामक गाडी आल्याने आग नियंत्रणात आणली व होणारी दुर्घटना टळली.या तिन्ही आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.वाढत्या उष्णतेमुळे दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा आतापर्यंत पाच सहा ठिकाणी आग लागली असून परिसरातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कुंभार यांच्याकडून करण्यात आले आहे.