अमरावती : अमरावती-नागपूर या द्रृतगती महामार्गावर दररोज हजारो ट्रक ये जा करीत असतात. सध्या मात्र कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने 24 तासात या महामार्गावरून केवळ दोनशेच्या आसपास ट्रक धावत आहेत.
नागपूर ते अमरावती द्रृतगती महामार्ग हा पुढे धुळेपर्यंत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे. या महामार्गावरून मुंबई, कोलकाता, बंगळुरू अशी महत्त्वाची शहरे जोडली जातात. या महामार्गावरून 24 तास सतत हजारो ट्रक, शासकीय तसेच खासगी बसेस, अनेक छोटी मोठी वाहने धावत असतात. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे फळे, भाजी आणि इंधन वाहून नेणाऱ्या वाहनांनाच महामार्गावरून धावण्याची परवानगी आहे.
विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या वाहनांकडून टोलही वसूल केला जात नाही. सध्या सर्व बंद असल्यामुळे ट्रक चालकांना मार्गात कुठे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. घरातून निघताना जेवणाचा डबा आणि पाणी घेऊनच ट्रकचालकांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. मार्गात एखाद्या ठिकाणी काही स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते ट्रक चालक आणि रुग्णवाहिका चालकांना जेवण आणि पाणी पुरविण्याची सेवा करीत आहेत. मात्र, ट्रक चालकांना घराबाहेर पडल्यावर वाटेत कुठे खायला, प्यायला मिळेल याची कुठलीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत लगतच्या गाव खेड्यातून भाजीपाला, फळे, दूध घेऊन शहरात येणारे ट्रक, मिनी ट्रक तसेच लांब पल्ल्यावर इंधन आदी जीवनावश्यक सेवा पुरविणारे ट्रक चालक हे खऱ्या अर्थाने सध्या राष्ट्रसेवाच करीत आहेत.