अमरावती - मेळघाटमधील गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमारच जबाबदार असल्याचे लिहले आहे. त्यानंतर आरोपी शिवकुमारला पोलिसांनी नागपूरमधून अटकही केली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. दीपाली यांनी मृत्यूपूर्वी आपले पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ते पत्र ईटीव्ही भारतच्या हाती लागले आहे. त्यामध्ये "मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे", अशी ओळ दीपाली यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दीपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
![दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11187911_letter.jpg)
प्रिय नवरोबा...
लिहून-लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुझ्या सोबत बोलत-बोलत मी लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा... कारण आता मी जीव देत आहे.
साहेब मला काय-काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत, तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात..
मी खूप सहन केलं पण आता माझी लिमीट खरच संपली आहे..यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही..तुझ्याशी बोलायला हवं होतं, मी तुझी वाट पाहत होते घरी यायची..आज आई पण गावी गेली.. घरी कोणीच नाहीये, घर खायला उठत आहे.. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर.. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस माझ्यावर खूप प्रेम करतोस.. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास.. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रास देणं कमी झालं नाही.. मला त्याच्या हाताखाली काम करावं लागणार म्हणून मी त्याच्या वागण्याची कधीच तक्रार केली नाही.
जानू, तुला नेहमी वाटतं की मी तुझ्यापेक्षा खूप मोठ्या पदावर जावो. त्यासाठी तू प्रयत्न पण करत आहेस पण मी खोट्या प्रकरणांमध्ये इतकी वाईट फसले आहे की, मला बाहेर निघता येत नाही."मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार. तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे."
बाकी जाऊ दे तु तुझी काळजी घे तुझी म्हणजे तुझ्या पोटाची बरं.. खूप व्यायाम कर नेहमी सारखा.. माझ्यासारखा आळशी नको बनू..आईची व नितेशची काळजी घे. तूच सगळ्यांना सांभाळणार आहेस. मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं.. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे.. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ.. पण आज मी तुला सोडून जात आहे.. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा याला धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे..
आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू.. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे.. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार आहे.
कोण आहे मनीषा उईके, शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान
दीपाली चव्हाण यांनी पतीला लिहलेल्या पत्रात ज्या मनीषा उईकेचा उल्लेख केला आहे. ती मनीषा उईके कोण? तिचा आणि दीपाली चव्हाण यांचा संबंध काय? दीपाली मृत्यू प्रकरणाशी मनीषा उईकेचा संबध आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नव्याने उपस्थित झाले आहे. पोलिसांनी आता मनिषा उईके कोण आणि तिचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.
काय आहे प्रकरण -
मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या 2014मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली नियुक्ती मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरिसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी 'मांगीय' या गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी याबाबत विनोद शिवकुमारला माहिती दिली. मात्र, त्या खोटे बोलत असल्याचा आरोप करत दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देखील शिवकुमारने मदत केली नाही.
असा करायचा अपमानित
याशिवाय शिवकुमार रात्रीला गस्ती दरम्यान चव्हाण यांनी कुठेही बोलवून असभ्य बोलायचा. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर तो चव्हाण यांना अपमानित करायचा. शिवकुमारच्या मर्जीने वागत नसल्याने दीपाली यांचे वेतन देखील रोखण्यात आले, मानसिक छळ केला. गर्भवती असताना घरी जाण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असे विविध आरोप दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिवकुमार विरोधात केले आहेत.
हेही वाचा - दिपाली चव्हाण यांना लहानपणापासूनच होती अधिकारी व्हायची इच्छा