अमरावती: सातपुडा पर्वत रांगेत वसलेले मेळघाट म्हटले की उंच पहाड, घनदाट जंगल, नयनरम्य धबधबे असे सारे काही डोळ्यासमोर चित्र उभे राहते. मेळघाटात असणाऱ्या असंख्य वैशिष्ट्यांमध्ये मेळघाटातला मोह हा अनेक पर्यटकांना मोहात पाडणारा असाच आहे. खरेतर अनेकांना या मोहामुळेच मेळघाट पर्यटनाचा मोह देखील आवरत नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणारे नाही.
मोहा आदिवासींचा कल्पवृक्ष : मोह हा उष्ण कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. भारतात उगवणाऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये त्याची गणना केली जाते. मोहाची फुले पहाटे गोळा केली जातात आणि त्यांना वाळवून साठवून ठेवले जाते. आदिवासी बांधवांना जेव्हा पैशांची गरज असते. त्यावेळी सुकवलेली मोहाची फुले ते बाजारात नेऊन विकतात. मोहाच्या फळांमध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्याकाळी खाण्यासाठी मध्य भारतात आदिवासी हेच तेल वापरत. अजूनही मेळघाटातील अनेक आदिवासी मोहाच्या तेलाचा खाण्यासाठी वापर करतात. या झाडाची मूळे आणि फांद्या इंधन म्हणून वापरल्या जातात मोहाचे लाकूड मोठे असते, मात्र ते जास्त काळ टिकत नाही. मार्च महिन्यात येणारी मोहाची फुले मे महिन्यापर्यंत राहतात. आदिवासी बांधव देवाधर्मात, औषधात मोह फुलांचा सर्रास वापर करतात. या फुलांपासून दारूही काढली जाते. मोहाच्या फुलाफळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्यामुळे या झाडाला आदिवासींचा कल्पवृक्ष असे देखील म्हटले जाते.
सिड्डूमुळे स्थानिक बोलायला लाजतात : मेळघाटात सिड्डू अतिशय प्रसिद्ध आहे. सिड्डू याचा अर्थ मोहाची दारू असा होतो. मेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये ही सिड्डू मिळते. मात्र बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची पारख केल्यावरच सिड्डू गावात कुठे मिळते याची माहिती ग्रामस्थ अनोळखी व्यक्तीला देतात. बाटलीभर दीडशे ते दोनशे रुपयात ही सिड्डू मिळते. ज्या पर्यटकांना मोह फुलांचे महत्त्व माहिती आहे असे पर्यटक मार्च ते मे या महिन्यात मेळघाटात येतात. त्यांना 50 ते 80 रुपयाला शेरभर मोहाची फुले विकली जातात. मोहाची सिड्डू आणि फुलांची विक्री याद्वारे मेळघाटातील आदिवासी बांधवांसह या भागात वास्तव्याला असणाऱ्या गवळी बांधवांच्या हातात बऱ्यापैकी पैसा येतो. आता बचत गटांमार्फत मोहाचे लाडूसह विविध प्रकार तयार करणे आणि विक्रीवर भर दिला जात आहे. मोह फुलांच्या विक्रीतून मेळघाटातील रहिवाशांना बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत. खरंतर सिड्डूमुळे मेळघाटातील स्थानिक रहिवासी हे मोह फुलांची माहिती देण्यास लाजतात.
असे आहेत मोहाचे फायदे : राज्य सरकारने मोहफुलावरील बंदी उठवल्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांना याचा मोठा लाभ होत आहे. संपूर्ण भारतात मोह फुलाचे उत्पादन हे 22 लाख टन इतके आहे, तर संपूर्ण मेळघाटात मोहाची जवळपास 25 ते 30 हजार झाडे आहेत. मोहफुलामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 67.9 टक्के आहे. एक टन मोह फुलापासून सुमारे 300 चाळीस लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. मोह फुलांची केवळ दारूच निघत नाही तर, आज मोह फुलाचे लाडू, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती तसेच सॅनिटायझर अशा विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. मेळघाटात सध्या बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोहापासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. अनेक व्याधींसाठी उपयुक्त असणारे मोहाचे लाडू मेळघाटातील आदिवासी महिलांच्या बचत गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहे. अमरावती शहरासह विदर्भात विविध भागात आयोजित केल्या जाणाऱ्या शासकीय कृषी मेळाव्यामध्ये मेळघाटातील मोहाचे लाडू अनेकांना आकर्षित करायला लागले आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांना देखील औषध म्हणून मोहाचे लाडू खायला दिले जातात. तसेच मोह फुलांमध्ये 1.40 टक्के प्रोटीन आहे. तसेच 70 टक्के खनिज, 22.70 टक्के कार्बोहायड्रे, 111 टक्के कॅलरीज, 45 टक्के, कॅल्शियम, 23 टक्के लोहतत्व आणि 40टक्के विटामिन सी असल्याचे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा: Gardenia Tergeria Tree Amravati या झाडालाही होतात गुदगुल्या माणसाला अनेक व्याधीतून करते मुक्त काय आहे वैशिष्ट्य