अमरावती - अवैधरित्या बियाणे विक्री करणार्या अमरावतीच्या परतवाडा शहरातील दोन बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाने धाड टाकली. यामध्ये बोगस बियाणे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.
अमरावतीच्या परतवाडा येथील राजू अग्रवाल व रामू अग्रवाल यांच्या मालकीच्या दुकानांवर कृषी विभागाने शुक्रवारी रात्री धाडी टाकून दोनही दुकानांतून मुदतबाह्य बियाणे जप्त केले. परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात बोगस बियाण्यांची विक्री होत आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यामुळे विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे अधिकृत परवाना नसतानाही ज्वारी व भाजीपाल्याची मुदतबाह्य बियाणे आढळून आल्याने दोन्ही दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे. मागील दोन दिवसांपासून मेळघाटात थोडा पाऊस झाल्याने आदिवासी बांधव कृषी केंद्रातून दर्जेदार बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. त्याचा फायदा बोगस विक्रेत्यांनी घेतला. आता त्यांच्यावर कारवाईला सुरूवात झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असून, अशा दुकानांवर कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.