अमरावती - लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी दारूची शासन मान्य दुकाने बंद असल्यामुळे गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज पोलिसांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील दोन ठिकाणी छापा टाकला. कारवाईमध्ये पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून लाखोंचा दारूसाठा जप्त केला.
पोलिसांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर छापा टाकून एका ठिकाणाहून ३४ ड्रम मोह सडवा, १६० लोखंडी डब्बे मोह सडवा व ३५ हातभट्ट्या, असा एकूण ४ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा माल जागीच नष्ट केला आहे. तर, दुसऱ्या एका घटनेमध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरवाडी येथे सापळा रचून एका ठिकाणाहून १२ हजार किमतीची १२० लिटर दारू व वाहन असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील ३८ दिवसात १ कोटी १० लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त करून सुद्धा दारू विक्री सुरूच असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
हेही वाचा- अमरावतीच्या परतवाडा शहरात पोलिसांसोबत आता २५० तरूण रस्त्यावर