अमरावती: अचलपूर शहरातील विलायतपुरा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. पोलिस सूत्रांनुसार, कोमल अजितसिंह बुंदेले- ठाकूर (४०, रा. विलायतपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. अजित अभिमन्यू बुंदेले- ठाकूर (४०) असे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. मागील अनेक दिवसांपासून तो अचलपूरला वास्तव्यास आहे. त्यांना १६ व १४ वर्षांची दोन अपत्ये आहेत.
चारित्र्यावर संशय घेत होता: कोमल ही एका कापड दुकानात, तर आरोपी अजित हा किराणा दुकानात कामाला होता. मागील चार महिन्यांपासून ती नजीकच्या हिरापुरा येथील माहेरी होती. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ती पतीकडे परतली. ती घरात दाखल होताच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या भांडणातच त्याने घरात असलेल्या टोकदार दगडाने डोके ठेचून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोमलला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
आरोपीला अटक: खून केल्यानंतर आरोपी अजीत हा विलायतपुरा परिसरातून बाहेर पडत असताना पकडले. ही कामगिरी अचलपूरचे ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पुरुषोत्तम बावनेर, सिद्धार्थ वानखडे, अंकुश अरबट, श्रावण काळबांडे, प्यारेलाल जामूनकर यांनी केली. तर अजितला दारूचे व्यसन जडले होते. मद्यधुंद अवस्थेत तो कोमलशी वाद घालायचा आणि चारित्र्यावर संशय घेत होता. या त्याच्या वृत्तीला कंटाळून ती काही दिवसांपूर्वी माहेरी राहायला गेली होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अचलपूर पोलिस करीत आहेत.
|