अमरावती - कोरोनाचा वाढता ऊद्रेक रोखण्यासाठी शासनातर्फे निशुल्क लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील लसीकण केंद्रावर उसळलेली गर्दी पाहता हे लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लसीकरणासाठी झुंबड -
लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी एकच ऑपरेटर असल्याने आणि एका नोंदणीला १० मिनीटे वेळ लागत असल्याने नागरिक एकमेकांच्या अंगावर जाऊन पडत असल्याचे चित्र बघायला मिळाले. दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही आल्यापावली परत जावे लागले. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांचेशी संपर्क साधला असता आमच्याकडे कर्मचारी कमी आहे. ग्रामीण रुग्णालयाने यात मदत करायला हवी, असे सांगून वेळ मारुन नेली. तर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार डॉ. रहाटे हे दोनच दिवस ग्रामीण रुग्णालयात येतात. त्यांच्याकडे दर्यापूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा प्रभार आहे, त्यामुळे नियोजन करणार कोण आणि गर्दीमुळे जर कोरोनाचा संसर्ग वाढला तर जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दहा दिवसांच्या अंतराने लसीकरण -
अंजनगांव सुर्जी तालुक्यासाठी १३ तारखेनंतर २३ तारखेलाच लसीकरण होत असल्याने आणि त्यातही तालुक्यासाठी ५०० डोस देण्यात येत आहेत. त्यामुळे शासनस्तरावर लसीचे डोस वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.