अमरावती - कटाईसाठी जाणाऱ्या 58 उंटांना जिल्ह्यातील प्राणीमित्र संघटना ( Amravati Pranimitra Sanghatna ) आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या तळेगाव दशासर पोलिसांच्या माध्यमातून ( Camel Caught In Amravati ) जीवनदान मिळाले. खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी या सर्व उंटांची व्यवस्था अमरावती शहरातील गोरक्षण ( Dustur Nagar Gorakshan ) संस्थेत केली. जवळपास महिनाभरापासून दस्तूर नगर परिसरातील गौरक्षण संस्थेत असणाऱ्या या उंटांना अमरावती शहरातील वातावरण किती पोषक आहे, याबाबत प्राण्यांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या राजस्थानमधील स्वयंसेवी संस्था तसेच अमरावती शहरातील वन्यजीव प्रेमींनी प्रश्न उपस्थित केला आहे. अमरावतीत उंटांची योग्य व्यवस्था करण्यात आली असली, तरी मृत्यूच्या दाढेतून सुटलेल्या या उंटांना त्यांच्या मूळ प्रदेशात पाठवणे योग्य असाच सल्ला वन्यजीव प्रेमींनी दिला आहे. आता हे 58 उंट आपल्या मूळ भूमीत कधी परतणार याचीच प्रतीक्षा आहे.
काय आहे प्रकरण -
राजस्थानातील उंटांना कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेले जात असतात याची माहिती प्राणीमित्र संघटनेला मिळाली होती. राजस्थानातून सुमारे 1200 किलोमीटर अंतरापर्यंत या उंटांना पायदळ आणि मारहाण करून चार जण घेऊन जात असल्याची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलिसांनी 8 जानेवारी रोजी सर्व 58 उंटांना जीवनदान देत 14 जणांची कसून चौकशी केली. दरम्यान, या 58 उंटांना नेमके कुठे ठेवावे, असा पेच निर्माण झाला होता. मात्र, खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने 11 जानेवारी रोजी या सर्व उंटांना अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक येथील गौरक्षण केंद्रात आणण्यात आले.
गोरक्षण संस्थेत अशी आहे व्यवस्था
अमरावती शहरातील गौरक्षण संस्थेची स्थापना ही 130 वर्षांपूर्वी झाली असून या संस्थेकडे एकूण 700 गाई आहेत. यापैकी अंबा देवी मंदिर परिसरात संस्थेच्या जागेवर 363 गाई आहे, तर दस्तुर नगर येथील जागेवर 337 गाई आहेत. दस्तूर नगर येथील गौरक्षण संस्थेच्या 337 गाईंसोबतच आता सुमारे महिनाभरापासून 58 उंट वास्तव्याला आहेत. गौरक्षण संस्थेच्यावतीने गाईच्या चाऱ्यासाठी एक कोटी 60 लाख रुपये वर्षाला खर्च केले जातात. यामध्ये चारा मका कुट्टी ज्वारी आणि दोन प्रकारच्या गवतांचा समावेश आहे. गाईंसोबतच आता 58 उंटांनाही योग्य खाद्य मिळावे, अशी व्यवस्था गौरक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
डॉक्टरांकडून उंटांची आरोग्य तपासणी -
गौरक्षण संस्थेकडे असणाऱ्या 58 उंटांची नियमित आरोग्य तपासणी पशुचिकित्सकांकडून केली जात आहे. गोरक्षण संस्थेत असणाऱ्या उंटांचे आरोग्य अतिशय चांगले असून त्यांना उत्कृष्ट दर्जाचे खाद्य असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी देवराव हटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. मात्र, या उंटांना कायमस्वरूपी इथल्या वातावरणात ठेवणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उंटांना राजस्थानमध्ये पाठवण्याची मागणी -
देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पशु क्रूरता निवारण समिती आहे. अमरावती जिल्ह्यातील या समितीने सर्व 58 उंटांची जबाबदारी स्वीकारावी. या सर्व उंटांना त्यांच्या राहण्याची मूळ ठिकाण असणाऱ्या राजस्थानमध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राजस्थानमधील जनचेतना आंदोलन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुजीतकुमार चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली असल्याचे सांगितले आहे. अमरावती जिल्ह्यातील पशु क्रूरता निवारण समितीने राजस्थानमधील एखाद्या जिल्ह्याच्या पशु क्रूरता निवारण समितीशी संपर्क साधून त्यांच्याकडे हे उंट सोपवावे, अशी आमची मागणी असून उंटांच्या सुरक्षिततेसाठी हाच योग्य मार्ग असल्याचेही सुजीतकुमार चौधरी यांचे म्हणणे आहे.
असे आहे वन्यजीवप्रेमींचं म्हणणे
अमरावती शहरातील गौरक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या 58 उंटांची योग्य काळजी घेतली जात असली तरी या उंटांना त्यांचा मूळ अधिवास असणाऱ्या प्रदेशातच पाठविणे योग्य असल्याचे वन्यजीव प्रेमी आणि महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. महाराष्ट्र शासनाने राजस्थान सरकार सोबत याबाबत बोलणी करून या 58 उंटांना त्यांच्या मूळ अधिवास असणाऱ्या भागात पाठविण्याची व्यवस्था करावी, असेही यादव तरटे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - अमरावती मनपा आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक; जय भवानी जय शिवाजी दिल्या घोषणा