अमरावती - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्राणज्योत आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मालवली. ही घटना अंत्यत दुर्दैवी आहे. मात्र, पीडितेला निश्चितच न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. आम्ही कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. यासारख्या घटना रोखण्यासाठी महिला बालकल्याण राज्यमंत्री म्हणून यासाठी निश्चितच नवीन कायदे करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
पीडितेला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. मात्र, ती वाचू शकली नाही. तिच्या आई-वडिलांची भावना मी समजू शकतो. तिला न्याय मिळण्यासाठी सरकार त्या दिशेने कारवाई करत आहे, असेही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : सोमवारी सकाळीच पेट्रोल हल्ला अन् मृत्यूही सोमवारीच
हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज (सोमवारी) आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे.