अमरावती - मुसळधार पावसामुळे मेळघाटात वाहणाऱ्या सिपना, कोकरी आणि गडगा नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून जिल्हा प्रशासनाने मेळघाटात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सातपुडा पर्वतावरून वाहणारे पाणी सिपना, किकरी आणि गडगा नदीत वाहून येत असल्याने या तिन्ही नद्यांचे पात्र तुडुंब भरले आहे. धारणी शहरालगत गडगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने कुसुमकोट, राणीगाव, सवलीखेडा, गिलाई या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच धारणी शहरासोबत बैरागडसह 28 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या सर्व 28 गावांचा संपर्क तुटला आहे.
धुळघाट रेल्वे परिसरात वाहणाऱ्या कोकरी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. एकूणच मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा संपूर्ण मेळघाटला बसला असून प्रशासनाने या भागात सावधानतेचा इशारा दिला आहे.