अमरावती- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. थिलोरी गावाला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला. एका दिवसात या गावात ६३.८३ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नाला फुटून गावात पाणी शिरले होते. गावाच्या काठावरील ३० ते ४० घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
थिलोरी गावात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने लेंडी नाला फुटून गावातील ३० ते ४० संसार उघड्यावर आले आहेत. घरात पाणी शिरल्याने अन्न, धान्य जीवन उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. घरात पाणी शिरल्याने आता खायचे काय, हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गावातील पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे. महसूल विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.
पावसाने पिकांचेही नुकसान झाले आहे. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांनी या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मात्र, पाहणी दोरे हातात मात्र, प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत काही खरे नसते अशीच काहीशी स्थिती आहे.
थिलोरी गावात जिल्हा परिषदच्या माध्यमातून नालीची खोदकाम सुरू होते. मात्र, ते काम धीम्यागतीने सुरू असल्याने खोदकामामुळे संपूर्ण पाणी गावात शिरले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.