अमरावती - मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली. त्यानंतर आता पाऊस धो धो बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट ओढावले आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील दामोदर अण्णाजी सगने यांचे मुसळधार पावसामुळे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. याच तालुक्यातील एका शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. दामोदर अण्णाजी सगने यांना त्यांच्या ८ एकर शेतात चौथ्यांदा पेरणी करावी लागणार आहे. पेरणीच संकट त्यांच्यावर उभे ठाकले आहे. त्यामुळे आता जगावं की मरावं हा संतप्त सवाल शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
दामोदर सगने यांनी प्रथम कपाशी आणि तूर पेरणी केली होती. मात्र, पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी 10 हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी 2 लाख 40 हजार रुपयांचे बियाणे त्यांनी आपल्या शेतात पेरले. मात्र, मुसळधार पावसाने त्यांचे स्वप्न पार भंगले.
गरुवारी झालेल्या पावसाने त्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना आता चौथ्यांदा पेरणी करावी लागणार आहे. दरम्यान, सुरुवातीला नुकसान झालेल्या त्यांच्या शेतात शासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले मात्र त्यांना एकही रुपया आतापर्यंत मिळाललेला नाही.