अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा काल (बुधवारी) सायंकाळी 7च्या सुमारास अनेक भागात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी सात वाजता अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती पासून जवळच असलेल्या अंतोरा गावाच्या परिसरात मोठी गार पडल्याने रब्बी हंगामातील काढणीला आलेला कांदा आणि गहू पीक तसेच टरबूज पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. शिवाय संत्रा व इतर फळबागा व भाजीपाला पिकाचे देखील नुकसान झाले आहे. आगामी दोन दिवस म्हणजेच १६ तारखेपर्यंत विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंतोरा गावात काल सायंकाळी तब्बल अर्धा तास गारपीट व मुसळधार पाऊस झाला. येथील शेतकरी राजेंद्र बारबुद्धे यांनी काही दिवसांपूर्वी ९० हजार रुपये खर्च करून लावले टरबूज पूर्णपणे खराब झाले. तसेच काढणीला आलेला गहू, कांदा आणि तीळ पिकाचे नुकसान झाले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.