अमरावती - कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन 3 ला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अवैधरित्या होणारा गुटखा व्यवसाय मात्र सुरूच आहे. अशातच लॉकडाऊनदरम्यान अमरावती जिल्ह्यात २० लाख २५ हजारांचा गुटखा आणि तीन वाहने असा ४० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिसांनी ही कारवाई केली. यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनमुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तू सहज मिळणे शक्य नाही. मात्र अवैध गुटखा सहज उपलब्ध होत आहे. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती शिरखेड पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याआधारे नाकेबंदी करून 3 वाहनांमधून एकूण १३५ बॉक्समध्ये साठा केलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
शिराज शाह वल्द सत्तार शाह, जावेद खाँ वल्द रशीद खाँ, शहेनशहा वल्द बिसमिल्ला शाह, युसूफ खान वल्द समद खान, मोहम्मद शफीक वल्द मोहम्मद रशीद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे तसेच शिरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार केशव ठाकरे याांनी केली आहे.