अमरावती- अंजनगाव तालुक्यातील आडगाव खाडे येथील जय गुरुदेव आश्रमात संचारबंदीच्या काळात गोरगरीब, गरजूंना रोज जेवणाची व्यवस्था केली जात आहे. केवळ अंजनगाव शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातील गरजूंना जेवणाचे डबे देण्याचे कार्य आश्रमातील भाविक व कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बाबा जय गुरुदेव धर्मविकास संस्था उज्जैन आश्रमाच्या बाबा उमाकांतजी महाराज यांच्यामार्फत अंजनगावमधील शंभर पेक्षा जास्त गरजूंना रोज अन्नदान होत आहे. अंजनगावमध्ये बाहेरून आलेल्या व सध्यास्थितीमध्ये अडकून पडलेले तसेच गोरगरीब, मजूर वर्ग, अपंग अशा सर्वांना रोज जेवणाचे डबे दिले जात आहे. शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर, पोलीस कर्मचारी देखील या सेवेचा लाभ घेतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे, आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून आश्रमाचे सर्व कार्यकर्ते उत्कृष्ट पद्धतीने सेवा देत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यात अध्यक्ष मुरलीधर कडू, शंकर शिंगणजुडे, संजय रोहणकर, मोहन रोहणकर, देवानंद महल्ले, ब्रम्हदेव ढोले, रोहन रोहणकर, विश्वम्भर बोदडे, प्रमोद शिंगणजुडे, जानराव ठाकरे आदी कार्यकर्ते अतिशय उत्साहाने संचारबंदीच्या काळात सेवेतून मानवता धर्म निभवत आहे.
हेही वाचा- अमरावती पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'सॅनिटाईझ व्हॅन' दाखल