अमरावती - शिवसेना मुस्लीम विरोधी म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे, पण आम्ही मुस्लीम विरोधात नाही. पुर्वीच्या सरकारमध्ये ओम पुरीच्या गालासारखे रस्ते होते, आताच्या सरकारमध्ये हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते झाले आहेत, असे गोडवे शिवसेनेचे आमदार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारविषयी गायले.
ते अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी तिवसा येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी गुलाबराव गावंडे यांनी आपल्या शैलीत काँग्रेस राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे, शिवसेना नेते दिनेश वानखेडे, भाजप सरचिटणीस निवेदीता चौधरी, श्याम देशमुख, तिवसा विधानसभा संघटक विलास माहुरे आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, जप-शिवसेना रिपाइं महायुतीच्या काळात एकही दंगा झाला नाही, काँग्रेसच्या काळात दर आठवड्यात दंगा व्हायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पुन्हा भगवा फडकवा, शिवसेना भाजप युतीला साथ द्या, असे आवाहन केले. भारतीय क्रिकेट टीम हरत असेल तर पाकिस्तान विजयाचे फटाके भारतात फुटत असेल त्या मुसलमानांविरोधात आम्ही आहोत असेही पाटील म्हणाले. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नाही, नवनीत राणा यांना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सहकार्य करणार नाही त्यामुळे पुन्हा अमरावतीत आनंदराव अडसूळ विजयी होनार आहे. त्यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.