अमरावती - सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत संस्थांनचा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. संस्थांतर्फे याबाबतची माहिती देण्यात आली. चारशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्री कृष्णाजी अवधूत महाराजांच्या सावंगा विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर लोटत असतो. देशातील लाखो भक्त कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन कापूर जाळतात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे.
समतेचे प्रतिक असलेल्या देव व भक्तांच्या 72 फूट उंच झेंड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोड चढवण्याचे भव्य चित्तथरारक धार्मिक विधी याठिकाणी केले जातात. दरवर्षीप्रमाणे संस्थांच्यावतीने 13 एप्रिलला गुढीपाडवा यात्रा व 21 एप्रिलला रामनवमी यात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाविषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता यात्रेला येणाऱ्या भाविकांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार संस्थांनने संपूर्ण यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. भाविकांनी घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?