अमरावती - धारणी तालुक्यातील दुनी गावात वडील व मुलामध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद झाला. तो वाद सोडविण्याकरिता आजी व आई मध्ये गेली असता नातवाने आजीच्या डोक्यावर लाकडी दांडा मारून आजीची हत्या केली. तसेच आईलासुद्धा मारहाण करून जखमी केले.
दारूच्या नशेत नातवाने केला वार -
धारणी तालुक्यातील दुनी गावातील रहिवासी असलेले हरीचंद्र सज्जू जांभेकर (50) त्यांचा मुलगा रामेश्वर हरीचंद्र जांभेकर (30), आजी गँगू सज्जू जांभेकर (70) व हरीचंद्र यांची पत्नी हे चौघे त्यांच्या दुनी शेतशिवारात असलेल्या शेत सर्वे नंबर 72 मध्ये पेरणी केलेल्या पिकाची रखवाली करण्याकरिता शेतातच राहत होते. हरीचन्द्र यांचा मुलगा रामेश्वर काही काम न करता रोज दारू पिऊन शेती माझ्या नावावर करून द्या, असे म्हणत वारंवार वडिलां सोबत वाद घालत होता. बुधवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान वडील व मुलात परत शेतीच्या मालकीवरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रामेश्वरने लाकडी दांडा घेऊन वडीलांच्या अंगावर धावत गेला. या दरम्यान त्याची आई व आजी गँगु जांभेकर या दोघांतील वाद सोडायला गेल्या, त्यावेळी रामेश्वरने आजीच्या डोक्यात लाकडाचा दांडा मारून आजीची हत्या केली. तसेच आईलादेखील मारहाण करून जखमी केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी रामेश्वरला ताब्यात घेतले.
हेही वाचा - राज्यपालांकडे ती यादी कायद्याने गेली असती तर मंजूर झाली असती - विनोद तावडे