अमरावती : आपल्यावर होत असलेल्या खोट्या आरोपात संदर्भात ग्रामसेवकाने कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर तसेच मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गापूर येथील हनुमान मंदिर परिसरात उघडकीस आली आहे. चेतन गोपीचंद राठोड (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते अमरावती शहरातील अकोली मार्गावर असणाऱ्या सदानंद येथील रहिवासी होते. नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जावरा भरूरा या ठिकाणी ते ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
29 लाख रुपयांची रिकव्हरी : घरकुलाच्या प्रकरणात ऑडिट दरम्यान कागदपत्र सादर करण्यात आले नसल्यामुळे माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकव्हरी काढण्यात आली. घरकुलाची ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली असतानाही हे पैसे गहाळ केल्याचा ठपका माझ्यावर ठेवून मला सेवेतून कमी करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला कुठलीही मदत केली नाही, असा आरोप चेतन राठोड यांनी पत्रकात केला आहे. मी कर्ज काढून घर बांधले, त्याची परतफेड करावी लागणार आहे. माझ्यानंतर माझे कुटुंब उघड्यावर येईल. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबाची मदत करावी. प्रत्येकाने माझ्या कुटुंबाला एक हजार रुपये द्यावे, यामुळे माझे कुटुंब उघड्यावर येणार नाही, असे आवाहन देखील चेतन राठोड यांनी व्हाट्सअपवर पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.
माझ्या प्रियजनांना शेवटचा राम राम : माझी प्रिय पत्नी आणि माझ्यावर जीव लावणारे माझे सर्व मित्र मैत्रिणी यांना माझा शेवटचा राम राम, असे चेतन राठोड यांनी पत्रात लिहिले आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणत्याही अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवू नये, असे देखील या पत्रात नमूद केले आहे. बडनेरा लगत दुर्गापूर येथील हनुमान मंदिर परिसरात राठोड यांची एमएच 29 बीसी 4784 ही कार पोलिसांना आढळून आली. तसेच कारच्या बाजूला त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेला आढळला. बडनेरा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे.