अमरावती - जन्मदात्रीने आपल्या चिमुकल्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही चिमुकलीने विष शरीरात देऊनही संघर्ष चालूच ठेवला. मात्र, तिचा हा संघर्ष आज संपला आहे. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलिसांनी चिमुकलीला विष देणाऱ्या आईविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
असे आहे प्रकरण- अक्षरा अमोल जयसिंगकार (11 रा. अंजनसिंगी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आपल्याला पोटाचा त्रास असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होणार, या भीतीपोटी महिलेने मुलगी अक्षरा व लहानग्या मुलाला टाकलेल्या दुधात विष कालवले होते. ते विषयुक्त दुध दोन्ही मुलांना देऊन स्वत: देखील घेतले. तशी कबुली अक्षराची आई प्रिया अमोल जयसिंगकार (28, रा. अंजनसिंगी) हिने कुऱ्हा पोलिसांना दिली आहे.
दुधात दिले विष- 11 मे रोजी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास अंजनसिंगी येथे ती धक्कादायक घटना घडली होती. घटनेवेळी चिमुकल्यांचे वडील अमोल जयसिंगकार हे कामासाठी घराबाहेर गेले होते. अक्षरा व जय (7) यांनी 11 मे रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास आईकडून दूध घेतले. मात्र त्यादिवशी प्रिया हिने मुलांना दुधात विष मिसळविले. ते दूध मुलांना प्यायला दिले. त्यानंतर ते विष स्वत:देखील घेतले. हा प्रकार शेजाऱ्यांना माहिती होताच त्यांनी तिघा मायलेकांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी तेथे प्रिया, जयसिंगकार व अक्षराचा जबाब नोंदवून घेण्यात आला.
नागपूरला घेतला अखेरचा श्वास - अक्षराची प्रकृती बिघडल्याने तिला नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, अक्षराने तेथे शेवटचा श्वास घेतला. त्याबाबत कुऱ्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. आपल्याला पोटाचा असह्य त्रास होत असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होईल, या भीतीपोटी आपण ते कृत्य केल्याचा प्रिया हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंद आहे.या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-