अमरावती - गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले चार जण पूर्णा नदीत वाहून गेले. ही घटना वाठोडा शुकलेश्वर गावात घडली. चार यापैकी एकाचा मृतदेह आज (शुक्रवार) सकाळी सापडला असून तिघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - गोंदियात बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; साडे सहा लाखांचा माल जप्त
नदीपात्रात बुडालेले चौघेही गौरखेडा या गावातील रहिवासी आहेत. गुरुवारी सायंकाळी आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ते वाठोडा शुकलेश्वर येथे आले होते. यावेळी एका युवकाचा नदीत पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी तिघेजण धावून गेले. यावेळी त्यांचाही तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. चारपैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे. इतर तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासन युद्धपातळीवर शोध मोहिम राबवत आहे.