अमरावती - उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने तलाव, पाणवठे आटले असताना भानखेडच्या जंगलात चक्क निसर्गाची कृपा झाली आहे. भर उन्हाळ्यात या जंगलात पाण्याच्या झऱ्यांचा उगम झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
उन्हामुळे अमरावती शहरावर पाण्याच्या टंचाईचे सावट आहे. शहरासह लगतच्या जंगलातील पाणवठे, तलाव आटले आहेत. शहरातील वडाळी आणि छत्री तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना छत्री तलावाच्या मागे भानखेडच्या जंगलात एका दगडाखाली ओलावा असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर मधमाशा घोंगावत होत्या. ही बाब लक्षात येताच भानखेड वनपरिक्षेत्राचे वनरक्षक सुरेंद्र डहाके यांनी या ठिकाणी पाणी असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर प्रेम राठोड, बबलू बेठेकर, सुनील माळोदे, राजू काकड, गोपी बेठेकर या वनमजुरांकडून खोदकाम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दगडाखालून पाण्याचे चार झरे लागले. काही वेळातच खोदलेला खड्डा पाण्याने भरून गेला.
याठिकाणी लागलेल्या पाण्याच्या झऱ्यामुळे जंगलातील बिबट, हरीण, काळवीट, नीलगाय, मोर या प्राण्यांसह पक्षांची तृषातृप्ती होत आहे.