अमरावती - बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च करत आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाडात मागील तीन महिन्यात तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत बालकांमध्ये 29 दिवस ते एक वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे.
मेळघाटमध्ये आरोग्य यंत्रणा सक्रिय असल्याचा कितीही गाजावाजा होत असला तरी आकडे मात्र हे वस्तुस्थिती सांगणारे आहे. धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये आदिवासी बहुल मेळघाटात एकूण 322 गावे आहे. हा भाग कुपोषित बालके, बालमृत्यू आणि मातामृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, गंभीर परिस्थिती असतानाही मेळघाटात बालरोग तज्ज्ञ पाठवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गाभा समितीचे सदस्य बंड्या साने यांनी केला आहे.
वर्षभरात 213 बालमृत्यूंची नोंद
एप्रिल 2020 ते मार्च 2021 या एक वर्षाच्या कालावधीत मेळघाटमधील तब्बल 213 बालमृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर 10 मातांचा मृत्यूही झाला आहे. यामध्ये पावसाळ्यात कमी वजनाचे बाळ, जंतुसंसर्ग, श्वसन, कमी तापमान, जन्मजात व्यंगत्व इतर कारणे असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तरीही योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने येथील बालमृत्यूचा प्रमाण वाढल्याचा आरोप केला जात आहे.
...यामुळे होतात मृत्यू
मेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे मेळघाटात अनेक ठिकाणी दरड कोसळते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो, वीज पुरवठा देखील खंडित होतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणा वेळेवर पोहोचू शकत नाही. अनेक महिलांची प्रसूती ही घरीच होत असल्याने बाल व मातामृत्यू होतात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Video - अमरावतीच्या भानखेडा परिसरात वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन