अमरावती - भाजप पक्षाच्या महाजनादेश यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून महापर्दाफाश यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र काँग्रेसचे नेते माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील देशमुख यांना डावलून काँग्रेस पक्षाने रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर 2014 मध्येही काँग्रेसने रावसाहेब शेखावत यांना आमदारकीचे तिकीट दिले होते. असे असताना आज काँग्रेसचे नेते असलेले माजी आमदार रावसाहेब शेखावत हे या महापर्दाफाश यात्रेला गैरहजर राहिल्याने काँग्रेसमध्ये गटबाजी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.