अमरावती - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुसरा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा बाजार असल्याची जोरदार टीका माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये दोन लाखांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देणे याचा कुठलाही उल्लेख नसल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
बोंड अळीच्या नुकसानीची घोषणा नाही -
विदर्भात बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले असताना त्यांना नुकसान भरपाई देण्याचा कुठलाच उल्लेख करण्यात आला नाही. वीजेच्या बाबतीत, कृषी पंपाच्या बाबतीत घोषणा फसवणारी आहे. यात व्याज आणि दंडाची रक्कमच दामदुप्पट ठेवली आहे. ते अर्धी केली तरी शेतकऱ्यांना भरणे शक्य नाही. त्यांनी घोषणा केल्या आहेत. मात्र, त्या पूर्ण होणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे, अशी टोमणाही बोंडे यांनी लगावला.
हेही वाचा - राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी का नाही -
'हाताच्या कोपराला गूळ लावायचा आणि चाटायला सांगायचे मात्र कोपर काही तोंडापर्यत पोहोचणार नाही आणि तो गुळ काही खाता येणार नाही' अशी अवस्था सगळ्यांची करून ठेवली. अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय घोषित केले मात्र, त्याची तरतूद ठेवली नाही. उस्मानाबाद आणि सिंधुदुर्गमध्ये कसे 100 कोटी रुपये देता आले? आणि अमरावतीसाठी का तरतूद नाही? असा सवालही त्यांनी अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारला केला.
संत्रा प्रक्रिया केंद्राबाबत स्पष्टता नाही -
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प घोषित केला. तो जुना आहे की नवीन आहे? नवीन असला तर शासकीय आहे की खासगी आहे? कोणत्या जागेवर आहे? किती पैसे देणार? याचा काही उल्लेख नाही. संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांची, युवकांची फसवणूक करणारा हा आजचा अर्थसंकल्प असल्याचा आरोपही डॉ. अनिल बोंडे यांनी केला.
हेही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१-२२ : पर्यावरण आणि पर्यटनासाठी मोठी तरतूद