अमरावती- महाराष्ट्र व मध्य प्रदेश वनविभाग पथकाने अवैधरीत्या सागवान विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या घरावर छापा टाकला. छाप्यात एक लाखाच्या सागवानासह २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथे गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या जंगलातील सागवान चोरून आणून त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.
या व्यवसायाची माहिती मोर्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने यांच्या पथकाला मिळताच त्यांनी उपवनसंरक्षक अमरावती यांच्याशी संपर्क केला. यानंतर सागवान विक्रेता हा मध्य प्रदेशच्या वनविभागाच्या सीमेत येत असल्याने मध्यप्रदेश शासनाच्या वनविभागाशी चर्चा करून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
या कारवाईत अंदाजे एक लाख रुपयाचे सागवान, सागवानाच्या लाकडावर नक्षीदार काम करण्याचे यंत्र व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
मोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालय व मध्य प्रदेश वनपरिक्षेत्र कार्यालय, मोर्शी यांनी ही संयुक्त कारवाई करुन दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अवैधरित्या सागवान विक्री करणाऱ्या शेख हनिफ मुस्तक याला अटक करण्यात आली आहे.