अमरावती - वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंजनगाव सुर्जी शहरात बुधवारी 2 ट्रक सागवान जप्त केले. मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड करताना आढळून आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी दरम्यान त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर वन विभागाने ही कारवाई केली. राजाराम लक्ष्मण यावलकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अंजनगाव वनपरिक्षेत्रात राजाराम या व्यक्तीला अवैध वृक्षतोड करताना गस्तीवर असणार्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. नंतर वनविभागाच्या कोठडीत राजाराम याने आजपर्यंत तोडलेले लाकूड ज्या ठिकाणी पाठवले ते ठिकाण दाखवण्यास होकार दिला. यानंतर बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत अंजनगाव सुर्जी येथील अजित फर्निचर येथे तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात सागवान पासून तयार करण्यात आलेले फर्निचर आढळून आले.
हेही वाचा - अमरावतीच्या व्यापाऱ्याकडून पुसद येथे 18 लाखांची रोकड जप्त
वनविभागाने यासंदर्भात अजीज यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे तयार करण्यात आलेल्या फर्निचरसाठी सागवान अवैधरीत्या आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वनविभागाने त्यांच्याकडे असणारा संपूर्ण सागवान जप्त करून परतवाडा येथे नेला. विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात मेळघाट प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
हेही वाचा - अमरावती महापालिकेची स्वच्छता 'नौटंकी'