अमरावती - अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दहावर गेली आहे. मात्र यातील चौघे कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. दहा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर आता चारजण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात अद्याप दोन पॉझिटिव्ह रुग्ण उरले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.
अमरावतीच्या हाथीपुरा परिसरातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. तब्बल चौदा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांना डॉक्टरांच्या उपस्थित डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी फुले उधळून त्यांना निरोप दिला.
सध्या अमरावतीत संचारबंदी कायम असून जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. पहिले बाधित रुग्ण सापडल्यानंतर तत्काळ त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच रुग्णांचा आकडा वाढल्यानंतर लॉकडाऊन देखील कडक करण्यात आले. अद्याप उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.