अमरावती - चांदूर रेल्वे शहरात संचारबंदीच्या नियमांचा भंग करणाऱ्या पाच दुकानांवर ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक महसुल, नगर परिषद व पोलीस विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील संस्कृती कलेक्शन, भगवान साडी सेंटर, सपना कलेक्शन, खेतान स्टोअर्स व ओम स्टील यांच्यावर प्रत्येकी १० हजार रूपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करून एकूण ५० हजारांचा दंड वसूल केला. लाखानी स्टोअर्सने दंड न भरल्याने दुकान सील करण्यात आले.
अमरावतीतील रस्ते निर्मनुष्य -
अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोणा बधितांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडॉऊन लावण्यात आला आहे.15 मेपर्यंत जिल्ह्यात हा लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. नेहमी लोकांच्या गर्दीने फुलणारे रस्ते रविवारपासून ओस पडल्याचे चित्र दिसून आले. दररोज सकाळी जीवनाश्यक वस्तूच्या नावाखाली लोक रस्त्यांवर गर्दी करत होते. मात्र, जीवनावश्यक वस्तूंना देखील आता बंदी घातल्याने रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावतीच्या ज्यस्तब चौकामध्ये मोठा कापड बाजार आहे. या बाजारपेठेमध्ये दररोज हजारो लोकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे तिथले रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले.