अमरावती - नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला करावा लागतो. यंदा मात्र कोरोनाचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला. तरीही बळीराजाने जोमाने पेरणीला सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यात आज पासून मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात झाली आहे.
अमरावती जिल्हातील नांदगाव पेठ येथील प्रमोद खडसे या शेतकऱ्यांनी आज आपल्या 3 एकर ओलिताच्या शेतात कपाशीची पेरणी केली. यावेळी शेतातही फिजिकल डिस्टनिंंगचे भान ठेवून व तोंडाला मास्क लावून काम करताना शेतकरी, मजूर दिसून आले. साधारणपणे १५ मे नंतर मान्सूनपूर्व पेरणीला विदर्भात सुरुवात होते. मात्र, यंदा कोरोनामुळे व पावसाळा तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व पेरणीस सुरुवात केली.
अमरावती विभागाच्या हवामान खात्याने यंदा 15 जून नंतर पावसाचा अंदाज सांगितला आहे. मान्सूनचे आगमन जरा उशिराने होत असल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे लांबणीवर पडली आहेत. ७ जून पासून मिरुगला सुरुवात होते व या दिवसापासून पावसाळा सुरू होतो. त्यानंतर पेरणीला सुरुवात होते. मात्र, दमदार पाऊस जो पर्यंत पडत नाही तो पर्यंत शेतकरी राजा आपल्या शेतात पेरणी करत नाही. तर अनेक शेतकरी ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ते मान्सूनपूर्व पेरणी करतात. यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर या पारंपरिक पीकांची सर्वाधिक लागवड करण्यात येते. यंदा मात्र, वेगळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. या सर्व परिस्थितीवर मात करत बळीराजा पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. मान्सूनपूर्व वादळी पाऊसही यंदा झाला नाही. मात्र, आता केव्हा वाट पाहायची म्हणून सिंचनाची सोय असल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही भागात मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात केली आहे. मान्सूनचा पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा देखील सामना करावा लागतो. तर पेरणीस सुरवात झाल्याने दोन महिन्यापासून घरी बसलेल्या मजुरांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.