अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे, बाजारपेठ बंद असल्याने शेतातील माल हा तसाच पडून सडत असून शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी कंटाळून शेतपिकांवर ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट करून टाकले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंदची स्थिती होती. यामुळे, अनेक शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत पोहचू शकला नाही. शेतमाल शेतात तसाच पडून राहिल्याने जागीच सडून खराब होऊ लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे. बाजारभाव व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अमरावतीच्या कावडी वसाड गावतील गजानन भोंगाडे याने आपल्या दीड एकरावरील पानकोबीच्या शेतात ट्रॅक्टरने रोटरून व जनावरे सोडून पीक नष्ट केले आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावडी वसाड येथे अनेक शेतकरी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतात. परंतु, यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचे सावट आल्याने लाखो रुपयांचा भाजीपाला शेतातच सडून पडला. गजानन भोंगाडे यांनीही आपल्या दीड एकर शेतीवर पानकोबीची लागवड केली होती. त्यासाठी चांगली फवारणी आणि मशागतीसाठी हजारो रुपये खर्चसुद्धा केले. परंतु, भाजीपाल्याला भावच नसल्याने या शेतकऱ्याचा हिरमोड झाला असून त्याने आपल्या पानकोबीच्या शेतात ट्रॅक्टर व जनावरे सोडून पानकोबीचे शेतच नष्ट करुन टाकले आहे.