अमरावती - नैसर्गिक आपत्ती, कोरोना व टाळेबंदीने बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. भर उन्हाळ्यात मेहनत करून शेतकऱ्यांनी पिकवलेला भुईमूग व गहू अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणला होता. पण, बुधवारी (दि. 10 जून) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा गहू व भुईमूग पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा उघड्यावर असलेला शेतमाल झाकायला सुद्धा वेळ मिळाली नसल्याने हजारो क्विंटल माल तसाच पाण्याने भिजला आहे. याचा सर्वाधिक फटका भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजार समितीमध्ये पाणी शिरल्याने अनेक पोते भुईमुगाच्या शेंगा या पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजार समितीमधील नाली बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा शेतकऱ्यांचा माल भिजत असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी काय करतात, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - अमरावतीत मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस... शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची प्रतीक्षा