अमरावती- शेतात पेरेलेले सोयाबीनचे पीक न फुलल्याने मोर्शी तालुक्यातील तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने आज जिल्हा कृषी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतात पेरलेले सोयाबीनचे पीक निकृष्ट असल्याने ते फुलले नाही. त्यामुळे शेतकऱ्याने कृषी विभागात तक्रार केली होती. मात्र, कृषी विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा पवित्रा घेतला.
मनीष शामराव कडू (वय.३६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मनीष हे मोर्शी तालुक्यातील तुळजापूर येथील रहिवासी असून त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी १ लाख रुपये कर्ज घेऊन शेतात सोयाबीन पेरली होती. त्यांनी विक्रांत ३२ हे सोयाबीन बियाणे कंपनीकडून विकत घेतले होते. दरम्यान, त्यांच्या शेतालगतच्या सर्व शेतांमध्ये सोयाबीनचे पीक भरले असताना त्यांच्या शेतात मात्र सोयाबीन आलेच नाही. याबाबत त्यांनी मोर्शी पंचायत समितीचे उपविभागीय अधिकारी सातपुते यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र, सातपुते यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप करीत मनीष कडू यांनी विभागीय कृषी सहसंचालकांकडे तक्रार केली.
त्याचबरोबर, मनीष यांनी जिल्हा कृषी अधिकारी विजय चव्हाण यांनाही निवेदन सादर केले. वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे मनीष कडू यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे आज जिल्हा कृषी कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या संदर्भात प्रहारच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारून संबंधित शेतकऱ्याला न्याय द्यावा यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष चंद्रकांत खेडकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटायला आले होते. दरम्यान, प्रहारचे पदाधिकारी आणि कृषी अधिकारी विजय चव्हाण यांच्यात चर्चा सुरू असतानाच मनिष कडू हे कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्याने अनर्थ टाळला. दरम्यान, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
हही वाचा- शिवशाही अपघाताचे सत्र सुरूच... अमरावतीत स्कूल व्हॅनला धडक