अमरावती - शेतातील विद्युत वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेले खांब यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे जमिनीवरील तारांना स्पर्श होऊन रूपरावजी नागोराव ठाकरे (६८) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सालोरा बु. येथे ही घटना घडली आहे.
गोपाळपूर, सालोरा येथील नागरिकांनी धोकादायक अवस्थेत असलेल्या तारा व खांबा संदर्भात माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती. यानंतर कोणत्याही प्रकारची दुरूस्ती न केल्याने हा प्रकार घडला आहे.
यानंतर संतप्त गावकऱ्यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत शवविच्छेदन थांबवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
रूपराव ठाकरे यांचे सालोरा शिवारातच दोन एकर शेत आहे. याच शेतात ते मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास सोयाबीनमधील गवत कापण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजल्यानंतरही ते घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य व काही गावकरी त्यांच्या शोधात शेतात पोहोचले. यावेळी त्यांना जमिनीवर असलेल्या जिवंत वीज तारांच्या बाजूलाच ते पडल्याचे दिसले. त्यांना शॉक लागला असावा, असा गावकऱ्यांना अंदाज आला. त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा बंद करून झालेल्या प्रकाराबाबत वलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.