अमरावती - सततची नापिकी, त्यात परतीच्या पावसाने झालेलं नुकसान यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. अखेर धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीतम ठाकरे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने स्वत:च्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
प्रीतम ठाकरे यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे जवळपास एक लाख ५० हजार कर्ज आहे. यंदा त्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. वेचणीला आलेला कापूस आणि बोंडं सडून गेल्याने खरिपाचे पीक वाया गेले. अखेर त्यांनी आत्महत्या केली.
मागील चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतपिकांच मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन कपाशी, संत्रा उत्पादन शेतकरी यंदा पूर्णतः उध्वस्त झाले आहे.