अमरावती - पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. वामन महादेव मानकर (वय ७०, रा. वासेवाडी. ता. भातकुली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बँकेच्या जाचाला कंटाळून घेतला निर्णय
वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धरणात ८ एकर शेतजमीन गेल्यानंतर सरकारकडून अल्प मोबदला मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आज दुपारी काही गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या पेढी धरणाच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
हेही वाचा - अमरावतीच्या डॉ. संदेश गुल्हाने यांनी स्काॅटलंड संसदेत घेतली खासदार म्हणून शपथ
वामन मानकर हे शेतीच्या कामानिमित्त बँकेत गेले होते, मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली, त्रास दिला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. या घटनेची माहिती मिळताच रवी राणा यांनी तत्काळ वासेवाडी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
सातत्याची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त असून मुख्यमंत्र्यांनी आतातरी जागे व्हावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही रवी राणा यांनी सांगितले.
हेही वाचा - रेमडेसिवीर काळाबाजारप्रकरणी कठोर कारवाई करावी : देवेंद्र फडणवीस