अमरावती - शहरातील आंबागेटच्या आत असणाऱ्या बुधवारा परिसरात कोरोना रुग्णांची आता झपाट्याने वाढ होत आहे. 29 मे रोजी बुधवारा परिसरात पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यावर आज 1 जून रोजी या भागात कोरोना रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. आंबागेटच्या अगदी बाहेर दोघा जणांना कोरोनाची लागण झाली, तर यासह बडनेरा रेल्वे स्थानकावर सज्ज तीन रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमरावतीत आता कोरोनाबाधितांची संख्या 226 वर पोहोचली आहे.
रविवारी प्राप्त कोरोना अहवालात बुधवारा परिसरात 58 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला असल्याचे समोर आले होते. तसेच आंबागेटला लागून गेटच्या बाहेर असणाऱ्या परिसरात 34 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला असून हबिबनगर परिसरातील 25 वर्षाच्या पुरुषही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला. तसेच बडनेरा रेल्वे स्थानक पोलीस दलातील तीन जवानांनाही कोरोनाची लागण झाली.
सोमवारी सकाळी एकूण आठ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये बुधवारा परिसरात 18 वर्षाच्या तरुणासह 54 वर्षाचा पुरुष आणि 42 आणि 54 वर्षाच्या दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. यासोबतच चेतनदास बगीचा परिसरात 30 आणि 61 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला असून दसरा मैदान परिसरात 10 वर्षाच्या चिमुकलाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या काकडा या गावातील ३० वर्षाच्या पुरुषालाही कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जुन्या शहरालगत हैदरपुरा, हातीपुरा या भागात सुरुवातीला कोरोनाने थैमान घातले होते. आता मात्र या भागात कोरोनाचे संक्रमण कमी झाले असताना जुन्या शहरात मध्यभागी असणाऱ्या बुधवारा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. त्यामुळे अतिशय दाटीवाटीच्या असणाऱ्या जुन्या शहरात सध्या खळबळ उडाली आहे.