अमरावती - सध्या देशात कोरोना लसीचा ड्रायरन सुरु आहे.आज अमरावती जिल्ह्यात देखील ही प्रक्रिया सकाळी 8 ते 11 वाजे दरम्यान पार पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंजनगाव बारी व तिवसा येथील शासकीय रुग्णालयात ही रंगीत तालीम पार पडली.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यातील 100 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्राय रनमध्ये सहभाग नोंदवला. कोरोना लस उपलब्ध जरी झाली नसली तरी कोरोना लस आल्यानंतर ही लस कशा प्रकारे देण्यात येणार आहे, त्याची रंगीत तालीम यशस्वी रित्या पार पडली.
कोरोना लसीकरणाचे नियोजन
कोरोना लस कोणत्याही क्षणी भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबवण्यासाठी राज्य सज्ज झाले आहे. लसीकरण मोहीम योग्य प्रकारे पार पडावी, यासाठी ड्राय रन घेतली जात आहे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी हा ड्रायरन महत्त्वपूर्ण असणार आहे.
हेही वाचा - ठरलं..! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशकात होणार