अमरावती - अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड या गावात एका ग्रामस्थाकडे नळाच्या पाण्यातून दोन नारूसदृश जंतू निघाल्याची घटना घडली. लखाड येथील वार्ड नं १ मधील रहिवासी दादाराव संपतराव आठवले यांच्या घरी नळाचे पाणी भरताना स्टीलच्या ड्रममध्ये दोन केसाच्या आकाराएवढे नारूसदृश जंतू आढळून आले. त्यांची लांबी साधारणत: ५ ते ६ इंच होती.
संबंधिताने दोन्ही नारूसदृश जंतू काचेच्या बाटलीत भरून जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे तक्रार केली. लखाड येथील पोलीस पाटील राहुल सावरकर यांना संबंधित माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य संजय हिरे व अन्या काहीजणांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली.
सरपंच राजेश पाटील चौखंडे व पोलीस पाटील तसेच कोरोना दक्षता समिती सदस्य सचिव राहुल पाटील सावरकर यांनी पत्र तयार करून संबंधित माहितीचे निवेदन दिले आहे. गावकऱ्यांनी यासंबंधी गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांना माहिती दिली आहे.
गावातील लोकांचे आरोग्य बिघडू नये, तसेच लखाड येथे संकलन टाकी असल्याने इतरही गावात होणाऱ्या पाणीपुरवठा व त्यापासून इतर गावातील लोकांचे आरोग्य सद्यस्थितीत खराब होऊ नये, यासाठी पत्र लिहिले आहे. या घटनेची माहिती मोबाईलवर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी लखाडचे ग्रामस्थ करत आहेत.