अमरावती - नैतिक शिक्षणाच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देण्याचा डाव सरकारने आखला आहे. साधू, संत, मुल्ला, मौलवी यांचसाठी वेतन योजना आणून भारतीय घटना गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य काउंसिलची दोन दिवसीय सभा अमरावतीत अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकरांशी संवाद साधला.
सत्तेत पुन्हा एकदा आलेल्या भाजप सरकारने आपली विचारसारणी विद्यार्थ्यांवर लादण्यासाठी घाईघाईने शैक्षणिक मसुदा मंजूर करून जनतेसमोर ठेवला. हा मसुदा इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेत असल्याने भारतातील इतर भाषिकांवर हा अन्याय आहे. हा मसुदा सर्व भाषेत असायला हवा अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी केवळ एक महिन्याची मुदत देण्यात आली ती तोकडी आहे. भारतीय घटना, धर्मनिरपेक्षता, विज्ञान निष्ठता आणि सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या संस्थांमध्ये धार्मिक प्रसार आणि प्रचार होऊ नये याला बंधने आहेत. मात्र, शैक्षणिक मसुद्याद्वारे नैतिक शिक्षणाच्या नावाने मागच्या दराने धार्मिक शिक्षण देण्याचा सरकारचा डाव दिसत असल्याचे डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले. घटनेविरुद्ध सरकारचे सुरू असणारे प्रयत्न निषेधार्य आहेत. या विरुद्ध जनतेने जागृत राहण्याचे आवाहन डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव नावदेव गावडे, पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य राजन क्षिरसागर उपस्थित होते.