अमरावती : आरती दिव्यांग असल्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे व्यवस्थित चालू शकत नाही. त्यांची परिस्थिती बिकट आहे. वृद्ध आई- वडिलांना मोडक्या घरात आरती आधार देत आहेत. शासनाचा कोणताही लाभ त्यांना मिळाला नाही. तसेच लोकप्रतिनिधींच्या दारी जाऊन देखील कोणाचीही मदत मिळाली नाही. तर तिवसा तालुक्यात वंडली या गावात आरती नागमोते राहतात.
तीनचाकी गाडी मिळवण्यासाठी खासदार, आमदारांकडे अनेकवेळा विनंती केली आहे. मात्र, कोणीही मदत केली नाही. सर्वांनी फक्त आश्वासने दिली होती. त्यामुळे मला जुनी तीनचाकी गाडी घ्यावी लागली. आता आमदार बच्चू कडू यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा आहे - आरती नागमोते, दिव्यांग
तीनचाकी गाडी घेतली सेकंडहॅन्ड : आरती नागमोते यांनी आपल्याला तीनचाकी गाडी मिळण्याबाबत केलेल्या विनंतीची दखल कोणीही घेतली नाही. तीनचाकी गाडी मिळावी यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे विनंती केली होती. त्यांनी तीनचाकी गाडी देऊ असे केवळ सांगितले. मात्र, मदत केली नाही. खासदार नवनीत राणा यांच्याकडे मदत मागितली असता, त्यांनी केवळ शंभर टक्के दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना मदत देऊ शकतो असे उत्तर आरती यांना दिले. छोट्याशा गावात दळण दळायला चक्की नाही. भाजीपाला देखील इथे मिळत नाही. यामुळे मला लहान सहान गरजांसाठी कुऱ्हा या गावाला जावे लागते. तीनचाकी गाडी अतिशय आवश्यक असल्यामुळे सेकंडहॅन्ड खरेदी करावी लागल्याचे आरती यांनी सांगितले.
पावसाळ्यात घर पडण्याची भीती : आरती यांचे वडील बाबाराव नागमोते हे कौडण्यपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून सेवा देतात. तर आई मंदाबाई या आरतीसोबत घरी असतात. वयाच्या चाळीशीत असणाऱ्या आरती यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. मात्र, हाती कुठलेही काम नाही. त्यामुळे वडिलांना विठ्ठल मंदिर संस्थानकडून जे काही पैसे मिळतात त्यातूनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. नागमोते कुटुंबाचे मातीचे घर असून, या घराची एका बाजूची भिंत खचली आहे. मुसळधार पावसात छत कोसळण्याची भीती आरती यांनी व्यक्त केली. घरकुलसाठी वारंवार अर्ज करून देखील ग्रामपंचायतने अद्यापही घरकुल मंजूर केले नसल्याची खंत देखील आरती यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू यांच्याकडून मदतीची अपेक्षा : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने राज्यात अपंगांचे स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात आले आहे. बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी आशेचे किरण आहेत. आमदार बच्चू कडू यांच्याकडून मदत मिळू शकेल अशी अपेक्षा असल्याचे आरती नागमोते म्हणाल्या. आमदार बच्चू कडू यांनी माझी व्यथा जाणून घ्यावी असे आरती म्हणाल्या. आमदार बच्चू कडू हेच माझ्यासह अनेक दिव्यांग बांधवांसाठी आशेचे किरण असल्याचे देखील आरती यांनी सांगितले.
हेही वाचा -