अमरावती- वारंवार सूचना देऊन व कारवाई करूनही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात मास्क न लावणार्याला ठाणेदार दीपक वानखडे यांनी वेगळ्याच पद्धतीने धडा शिकविला. मास्क न घालणार्याचा हार घालून पोलीस स्टेशनमध्ये गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला. पोलिसांच्या या गांधिगिरीची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली असून आता तरी नागरिक यापासून धडा घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मास्क न घालणाऱ्या नागरिकांचा पोलिसांनी आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला आहे. ठाणेदार दीपक वानखडे यांनी मास्क नसलेल्या युवकाचा हार घालून सत्कार केला. यामुळे अनेकांची मान शरमेने खाली झुकली होती. आवाहन न पाळणार्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी चांदूर रेल्वे पोलिसांना ही पद्धत वापरावी लागली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आवाहन करुनही विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर सुरुवातीला कारवाईचे हत्यार उपसले. त्यानंतर बुधवारी घराबाहेर पडतांना मास्क लावणे बंधनकारक असताना अनेक जण तोंडावर मास्क न लावता आपल्यासह इतरांचे आरोग्य धोक्यात टाकल्याप्रकरणी 57 लोकांकडून 11 हजार 400 रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली होती. यानंतरही काही नागरिक विना मास्कचे फिरत असताना दिसले. पुन्हा पोलीस विभाग व नगर परिषदेच्यावतीने मोहीम सुरू झाली. ठाणेदार दीपक वानखडे व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात मास्क न घालणार्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये गुरूवारी 31 नागरिकांकडून 7 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यादरम्यान साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी मोफत मास्क वाटपाचा उपक्रम या कारवाईसोबत सुरूच ठेवला होता.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु विनाकारण बाहेर फिरू नका व बाहेर पडल्यास किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे प्रशासनाच्यावतीने वारंवार बजावून सांगितले जात आहे.