अमरावती - जेवड नगर परिसरात एक हरिण आल्याचे आढळून आले. पाण्याच्या शोधात छत्री तलाव परिसरात ते आले असावे. तिथून वाट चुकून ते मानवी वस्तीत शिरले असावे, असा कयास केला जात आहे. वनविभागाच्या बचाव पथकाने हरणाला पकडून जंगलात सोडले.
जेवड नगर परिसरात हरिण शिरल्याची माहिती वन विभागाच्या बचाव पथकाला कळताच, बचाव पथक प्रमुख अमोल गावनेर पथकासह जेवड नगर परिसरात पोहोचले. यावेळी घाबरलेले हरिण वाट मिळेल त्या दिशेने पळत होते. बचाव पथकाने हरणाला सर्व्हिस गल्लीच्या दिशेने पालविल्यावर सर्व्हिस गल्लीतच मोठ्या शिताफीने त्याला पकडले.
धावपळीत जखमी झालेल्या हरणावर उपचार करून वनविभागाच्या बचाव पथकाने त्याला पुन्हा जंगलात सोडून दिले. हरणाला वाचविण्यासाठी अमोल गावनेर यांच्यासह फिरोज खान, वीरेंद्र उज्जैनकर, निलेश करवाडे, सतीश उमक, मनोज ठाकूर या बचाव पथकातील सदस्यांसह वन्यजीव प्रेमी सहभागी होते.