अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एका बैलाचा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे. शेतकरी शेतात डवरणी करत होते. त्यावेळी बैलाचा वाकलेल्या विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.
मंगरूळ चव्हाळा या गावातील मुरलीधर शिरभाते यांच्या शेतात पिकाच्या अंतर मशागतीसाठी डवरणीचे काम सुरू होते. मात्र, नदीलगत विद्युत प्रवाहाचे अनेक खांब हे जीर्ण अवस्थेत आहेत. यातील अनेक विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे शेतात डवरणी करताना विद्युत खांबाला बैलाचा स्पर्श झाला. शेतकऱ्यांच्या हातातील डवरीही लोखंडी असल्यामुळे त्यामध्येही विद्युत प्रवाह आला. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांनी डवरी सोडून दिली. त्यामुळे 3 शेतकरी आणि 1 बैल थोडक्यात बचावला आहे.
यावेळी बैल मालकाने महावितरण कंपनीला आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अन्यथा, महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्याने दिला आहे.